मुखपृष्ट |  आमच्याविषयी | स्फुर्तीस्थान |  कार्यक्रम |  उपक्रमसभासद देणगी चॆत्रावली मंडळसाहित्य |  छायाचित्र |  संपर्क
 
जाहिरात
 
 
साहित्य
 
आजचा समाज आणि तरुणाई

(संकेत स्थळाच्या उद्घाटनाच्या निमित्ताने)

आजच्या या ऐतिहासिक दिवशी आपण एका नव्या युगात पदार्पण करीत आहोत. आज आपल्या मंडळाच्या वेब साईटचे उद्घाटन होत असून आपण एका नव्या युगात पदार्पण करीत आहोत. आजचे हे जग दर दिवशी ज्या वेगाने पुढे जात आहे ते पाहून या प्रवासासाठी लागणारे ज्ञान आपणाला असणे आवश्यक आहे. आजच्या तरुणाईला जे तंत्रज्ञान उपलब्ध आहे त्यावरून जगाच्या बरोबर चालणे हे सहजसाध्य होत आहे. अशाच तरुणांना आज आपण आवाहन करू या की, त्यांनी आपले ज्ञान वापरून आपली आणि पर्यायाने समाजाची जडण घडण करावी. आज उगाचच तरुणांना दोष  देऊन त्यांचा उत्साहभंग करू नका, तर त्यांना बरोबर घेऊन आपण आपला आणि पर्यायाने समाजाचा विकास घडवून आणू शकतो.

आज या नेटवर्किंगच्या जमान्यात जग एवढे जवळ आले आहे की, एका मिनिटात आपण आपले म्हणणे दुसर्या टोकाच्या माणसाला सहज पोहोचवू शकतो. ही किमया केवळ प्रगत तंत्रज्ञानाने साध्य झाली असून आज त्या तंत्रज्ञानाचा वापर हे तरुणांच्या हातातील एक खेळणे झाले आहे. मागच्या पिढीतील लोकांना जे कठोर परिश्रम घ्यावे लागत होते त्या मानाने आजचे हे तरुण ज्या सहजतेने इतरांशी संपर्क साधतात ते पाहून आश्चर्याने तोंडात बोटे घालायची पाळी येते. म्हणूनच तरुणांच्या या कलेचा वापर करून आज आपण एकमेकांशी त्वरित संपर्क साधू शकतो व आपले म्हणणे इतरांच्या पर्यंत पोहोचवू शकतो. जुन्या पिढीतील लोकांनी हे नव्या पिढीला लाभलेले वरदान समजून त्याच्या ज्ञानाचा  उपयोग करून आपला समाज पुढे कसा नेता येईल याचा विचार करणे अत्यंत आवश्यक झाले आहे. तरुणांना नावे ठेवून काहीच फायदा होणार नसून उलट त्यात आपले नुकसानच आहे असा विचार जर ज्येष्ठांनी केला तर कितीतरी  गोष्टी सहज साध्य होवू शकतात. आमच्या काळी असे नव्हते असे बोलून तरुणांचा हिरमोड करण्यापेक्षा त्यांच्या कलाने घेवून नव्या तंत्रज्ञानाचा उपयोग  समाजाच्या उन्नतीसाठी करणे हीच खरी काळाची गरज आहे.      

आजच्या काळात जुन्या पिढीतील लोकांना सोशल नेटवर्किंग हे मायाजाल वाटण्याची शक्यता नाकारता येत नाही. पण हीच काळाची गरज आहे व या तंत्रज्ञानानेच  आपले भवितव्य आपण घडवू शकतो हा विश्वास आज जुन्या पिढीतील लोकांनी आत्मसात करावा लागेल. जर आज आपण याकडे दुर्लक्ष केले तर आपण या जगापासून खूप दूर जावू व नंतर आपल्यालाच त्याचा पश्चाताप करण्याची वेळ येईल हे वेळीच  लक्ष्यात घेणे जरुरीचे आहे. आज घरोघरी जे चित्र दिसते ते असे आहे की लहान मुले किंवा नातवंडे आजोबा व आजींना कॉम्पुटरवर कसे खेळावे किंवा कसे काम करावे याचे धडे देत असतात. आपण मात्र या लहान मुलांना हे सर्व कसे जमते असा विचार न करता आपल्याला हे कसे शिकता येईल याचा विचार करावयास हवा. काळाबरोबर जो जातो त्याचाच नेहमी विजय होत असतो हे ध्यानात घेवूनच आपण आपले वागणे सुधारावयास हवे. असे झाले तरच आपण आपले व समाजाचे विकास करण्याचे स्वप्न पुरे करू शकतो. आज आपल्या वरिष्ठ नागरिकांनी याचा गांभीर्याने विचार करण्याची वेळ आलेली आहे. आजसुद्धा असे अनेक आजी व आजोबा आपल्या लहान मुलांकडून याचे धडे गिरवताना बघून मनाला फार समाधान वाटते. इतरांनी त्यांचा कित्ता गिरवावा असे आवर्जून सांगावेसे वाटते.

एक जमाना असा होता की आपण आपल्या नातेवाईकांशी  किंवा मित्रांशी फक्त पत्राने किंवा टेलीफोनवर संपर्क  साधत होतो. आज ई-मेलच्या जमान्यात एका मिनिटात आपण जगाच्या दुसर्या टोकावरील माणसाशी मिनिटात संपर्क साधू शकतो. ही किमया केवळ आधुनिक तंत्रज्ञानाने केली असून त्याची कास धरणे हेच आपले परम कर्तव्य असले पाहिजे. त्यासाठी नवीन तंत्रज्ञ व नवीन पिढी यांचा योग्य उपयोग करूनच आपण हे साध्य करू शकतो. आज या व्यासपीठावरून मी आपणाला असे आवाहन करू इच्छितो की आपण सर्वांनी या नवीन साधनांचा जास्तीत जास्त उपयोग करून आपले आयुष्य सुखकर करावे व समाज पुढे नेण्यासाठी नवीन तंत्रज्ञानाचा उपयोग जास्तीत जास्त करावा. आज आपण एक पण करूया की मी किमान एका तरी व्यक्तीला कॉम्पुटर साक्षर करीन व माझे, त्या व्यक्तीचे आणि पर्यायाने समाजाचे भले करण्याचा प्रयत्न करीन.
चला तर जोमाने कामाला लागुया आणि आपले भविष्य उज्ज्वल बनविण्याचा एक उदात्त हेतू मनी बाळगूया. आजच्या या प्रसंगी मी एवढेच सांगू इच्छितो.