चां. का. प्रभु समाजोन्नती मंडळ, मुलुंड ८ मे २०१६
स्नेहसंमेलन २०१६
आमच्या चां. का. प्रभू समाजोन्नती मंडळ, मुलुंड व श्री चैत्रावली महिला मंडळ मुलुंड यांच्या संयुक्त विद्यमाने एका स्नेहसंमेलनाचे आयोजन केले होते. रविवार दिनांक ८ मे २०१६ रोजी मुलुंड (पू) येथील बी. पी. आय. एस. (जुने ठाकूर नगर विद्यामंदिर) येथे मोकळ्या पटांगणात याचे आयोजन केले होते.
उद्घाटक डॉ. अन्वय मुळ्ये व प्रमुख अतिथी श्री. अजित महाडकर यांच्या हस्ते दीपप्रज्वलन करून कार्यक्रमाची सुरुवात झाली.नंतर ईशस्तवन व गणेशवंदनाने गणपतीचा आशीर्वाद घेउन पुढील कार्यक्रमाची आखलेल्या तयारीप्रमाणे गाडी पुढे निघाली.श्री चैत्रावली महिलामंडळाच्या ५ पारितोषिक विजेत्या कन्यकांनी त्यांचा सुंदर कार्यक्रम पेश केला. प्रथम क्रमांकाने गौरविलेल्या या कन्यकांचे उपस्थितांनी टाळ्यांच्या गजरात कौतुक केले. अगोदर आवाहन केल्याप्रमाणे ज्ञातीतील उपस्थित २८ ज्येष्ठ नागरिकांचा सत्कार करण्यात आला. नंतर प्रमुख अतिथींचे बुके आणि स्मृतिचिन्ह देउन स्वागत करण्यात आले. मंडळाच्या अध्यक्षा श्रीमती नीला प्रधान यांनी प्रास्ताविकात मंडळाच्या वाटचालीची उपस्थितांना माहिती दिली व भविष्यातील उपक्रमांबाबत अवगत केले.
यानंतर मुलुंड स्थित फोर्टिस हॉस्पिटल येथे कार्यरत असलेले प्रसिद्ध हृदयशल्यविशारद डॉ. अन्वय मुळ्ये यांना त्यांचे अनुभव कथन करण्यासाठी पाचारण करण्यात आले. आपल्या ओघवत्या वाणीने सुमारे ५० मिनिटे डॉ. अन्वय मुळ्ये यांनी श्रोत्यांना अक्षरशः मंत्रमुग्ध केले. आपल्याला आलेले अनुभव, भारतात स्पष्टपणे जाणवणारी अवयव दानाबद्दल असलेली अनास्था, या बाबतीत करावी लागणारी लोकजागृती याबाबत डॉ. भरभरून बोलले.एका प्रथितयश सर्जनला असे ओघवत्या वाणीत बोलताना पाहून उपस्थितांना कृतकृत्य झाल्याचे समाधान लाभले.प्रसिद्ध हॉटेल्सची चेन उभारणारे श्री. विठ्ठल कामात हे डॉ. चे परममित्र. त्यांनी खास डॉ. ना फोन करून मी तुमचे भाषण ऐकण्यासाठी येणार आहे असे सांगितले. त्यांचे येणे हा आमच्यासाठी एक सुखद धक्काच होता. त्यानंतर श्री. अजित महाडकर यांनी आपले मनोगत व्यक्त करताना त्यांच्या T. I. F. R. मधील कार्याचा उल्लेख केला व आता सेवानिवृत्त झाल्यावर देखील त्यांच्या कार्यात ते होतकरू विद्यार्थ्यांना कशी मदत करतात ते विषद करून सांगितले.
एक खास उल्लेख येथे करावासा वाटतो की, जो आपल्या कायस्थ द्न्यातीला अभिमानास्पद आहे. मुलुंड मध्ये रहाणारा व ठाण्यात आपला स्टुडियो चालवणारा श्री. रोहित प्रधान याने दैदिप्यमान यश मिळविले आहे.”रेगे” या मराठी चित्रपटासाठी पहिल्या वाहिल्या मराठी फिल्मफेअर पारितोषिकाचा मानकरी. साउंड डिझायनर या विभागात रोहितने हे घवघवीत यश संपादन केले असून आम्हा मुलुंडकरांना त्याचा सार्थ अभिमान वाटतो.रोहितला सर्वांनी पुढील यशासाठी शुभेच्छा दिल्या व मंडळातर्फे स्मृतिचिन्ह देउन त्याला गौरविण्यात आले.या नंतर आभार प्रदर्शनाने कार्यक्रमाचा पूर्वार्ध संपला.
उत्तरार्धात “प्रशांत गुप्ते आणि पार्टी” यांचा मराठी व हिंदी गायनाचा अप्रतीम कार्यक्रम रसिकांची दाद मिळवून गेला. मुख्य वैशिष्ट्य म्हणजे या वाद्यवृन्दाचे प्रथितयश वादक आणि ४ पैकी ३ सुरेल आवाजाचे गायक जे सीकेपी आहेत. या चौघांच्या दर्जेदार व दमदार आवाजाने रसिकांची करमणूक केली.सोबत निवेदनासाठी आमच्याच मंडळाचे व मुलुंडचे श्री. शिरीष बेंद्रे यांनी आपल्या खुमासदार व माहितीपूर्ण निवेदनाने उपस्थितांची माने जिंकून घेतली.श्री. सुहास कर्णिक, श्री. प्रशांत गुप्ते व श्री प्रतीक फणसे या सीकेपी गायकांच्या जोडीने गायिका मिठ्ठू मुखर्जी यांनी मराठी व हिंदी गाणी सादर करून रसिकांची दाद मिळवली.अश्या तऱ्हेने संपूर्ण कार्यक्रमाचा आस्वाद घेतल्यानंतर आमचे नेहमीचे कॅतरर श्री. हेमंत रणदिवे यांच्या स्वादिष्ट, रुचकर व चविष्ट वडे मटणाच्या जेवणाने सर्वांना तृप्त केले. सर्वांचे कौतुक करीत उपस्थित सभासदांनी आणि पाहुण्यांनी प्रस्था केले.
धन्यवाद! |