मुखपृष्ट |  आमच्याविषयी | स्फुर्तीस्थान |  कार्यक्रम |  उपक्रमसभासद देणगी चॆत्रावली मंडळसाहित्य |  छायाचित्र |  संपर्क
 
उपक्रम
गडकरी कट्टा
श्री.विंझाई वधुवर सुचक केंद्र
वॆद्यकीय शिबीर व परिसंवाद
 
 
 
वॆद्यकीय शिबीर व परिसंवाद

दिनांक 13 एप्रिल 2012 रोजी मंडळाचे हितचिंतक व सल्लागार ज्येष्ठ स्वातंत्र्यसेनिक मा. श्री. दत्ताजी ताम्हणे यांनी त्यांच्या वयाच्या 100व्या वर्षात पदार्पण केले. निर्भेळ मनाने शतायुषी जगलेल्या आपल्या भाईकाकांचा वाढदिवस ह्यावर्षी मंडळातर्फे भव्य प्रमाणात करण्याचा आमचा मानस होता. तारीख सुध्दा निश्चित झाली होती. पण ऐनवेळी मध्यवर्ती चां. का. प्रभु ह्या संस्थेने हा कार्यक्रम सर्व सी.के.पी. समाजाच्या वतीने एकत्र करण्याचा घाट घातल्यामुळे आम्ही स्वतंत्ररित्या त्यांचा वाढदिवस साजरा करु शकलो नाही. तरी वाढदिवसाचे औचित्य साधून एक वैद्यकीय शिबीर त्यांच्या नावाने भरवायचे असे आम्ही ठरविले व त्यांच्याकडून ह्या उपक्रमाला जाहिररित्या पाठिंबा मिळाल्यावर आम्ही कामाला लागलो.

दिनांक 15 एप्रिल 2012 रोजी सकाळी 8 वाजता सुयोगच्या ए.सी. हॉलमध्ये ज्येष्ठ आर. सी. सी. तज्ञ श्री. राजन टिपणीस ह्यांच्या हस्ते उद्घाटन करुन वैद्यकीय शिबीराला सुरुवात केली. निरनिराळ्या गटांसाठी आयोजित केलेल्या रक्ताच्या चाचणीसाठी मुलुंडमधील तमाम नागरिकांनी ह्या सोहळ्यात भाग घेतला. मुलुंडच्या चौकाचौकात त्या संबंधीत अनेक फलक लागले असल्यामुळे लोकांची रीघ लागली. सर्वांना आगाऊ सुचना दिल्यागेल्यामुळे उपाशीपोटी अनेक अबालवृध्द मंडळी चाचणी करीता सुयोजित रांगेत आपल्या नंबराच्या प्रतिक्षेची वाट पहात होते. चाचणी केल्यानंतर त्या सर्वांना इडली, उपमा, चहा, कॉफी व बिस्कीटे असा नाश्ता मोफत देण्याची व्यवस्था मंडळातर्फे करण्यात आली होती.

बरोबर 10 वाजता मा. दत्ताजी ताम्हणे यांचे सभागृहात आगमन झाले. मुलुंड मधील अनेक प्रतिष्ठित मान्यवर डॉ. अरविंद प्रधान, आमदार सरदार तारासिंग, नगरसेवक श्री. नंदू वैती, श्री. प्रकाश गंगाधरे, समाजसेवक श्री. कैलास पाटील उपस्थित होते. व्यासपीठावरील सर्व मान्यवरांचे प्रथम श्री. दिलीप प्रधान यांनी पुष्पगुच्छ देऊन स्वागत केले. सोहळ्याचे प्रमुख पाहुणे म्हणून श्री. राजन टिपणीस यांनी त्यांचे मनोगत व्यक्त करुन मंडळाचे आभार मानले. वाढदिवसानिमित्त मा. दत्ताजी ताम्हणे यांनी त्यांच्या काही सुखद आठवणी जागृत केल्या आणि मंडळाला अशा प्रकारचे उपक्रम राबवत जा म्हणून शुभेच्छा व्यक्त केल्या. त्यानंतर आयोजित केलेल्या परिसंवादाला सुरुवात झाली. त्यात डॉ. दीपक गुप्ते - युरॉलॉजिस्ट, डॉ. गिरीष सबनीस – गायनॉकॉलॉजिस्ट, डॉ. नितीन कर्णिक – मेडीसीन, डॉ. समीर प्रधान – गायनॉकॉलॉजिस्ट व डॉ. हिमंशु बेन्द्र – ऑर्थोपेडिक तज्ञ अशा नामवंत डॉक्टरांनी ह्या परिसंवादात सहभाग घेतला असल्यामुळे डॉक्टर व प्रेक्षक यांच्यात सुंदर सुसंवाद घडत होता. अनेक रोगांचे निदान, समस्या व त्यावरील उपाय ह्याबरोबर आपल्या स्वतच्या स्वास्थ्याची पूर्व काळजी कशी घेतली जावी ह्याचे सखोल मार्गदर्शन मिळत होते. प्रश्नोत्तराच्या ह्या मैफीलीमुळे कार्यक्रमाची लज्जत वाढत होती. डॉक्टरांना आलेले अनुभव, रोग टाळण्यासाठी लागणारी दक्षता खुमासदार पध्दतीने मांडल्यामुळे उपस्थित लोकांच्या प्रश्नांचे निरसन होत होते. विशेष म्हणजे परिसंवादाचे सुत्रसंचालन मंडळाने नव्या होतकरु डॉ. कौस्तुभ दुर्वे व डॉ. कृतिका कारखानीस ह्या तरुण मंडळींकडे सोपविले होते व त्यांनीही अत्यंत मन लावून निर्विघ्नपणे ते पार पाडले.

ह्या पूर्ण कार्यक्रमाची सुत्रे ज्यांनी पहिल्यापासून हाताळली त्या डॉ. चारुचंद्र दुर्वे व सौ. डॉ. नीता दुर्वे ह्या दांपत्याचा आम्हांला मुद्दाम आवर्जून उल्लेख करावा लागेल. ह्यांच्यामुळे थायरोकेअर, नोव्हारटीस लिमिटेड व अल्केम लॅब्स् लिमिटेड ह्या प्रसिध्द औषधी कंपन्यांच्या मदतीने रक्ताच्या विविध चाचण्या खुपच कमी दरात उपलब्ध झाल्या. ह्या कार्यक्रमाची पूर्वतयारी काटेकोर व व्यवस्थित ठेवण्यामागे डॉ. चारुचंद्र दुर्वे, डॉ. नीता दुर्वे व डॉ. उल्हास प्रधान ह्यांचा मोलाचा वाटा आहे हयात तिळमात्र शंका नाही आणि म्हणूनच त्याची सांगता दत्ताजींच्या वाढदिवसानिमित्त आठवणीत राहील अशा तऱहेने पार पडली.