मुखपृष्ट |  आमच्याविषयी | स्फुर्तीस्थान |  कार्यक्रम |  उपक्रमसभासद देणगी चॆत्रावली मंडळसाहित्य |  छायाचित्र |  संपर्क
 
कार्यक्रम
नजिकच्या काळातले
कोजागिरी पोर्णिमा
कुंकुमार्चन
गडकरी पुण्यतिथी
विद्यार्थी सत्कार
स्नेहसंमेलन
सामुदाईक सहल
सामुदाइक व्रतबंध सोहोळा
 
 
 
कोजागिरी पौर्णिमा

संस्थेचा दुसरा उपक्रम वरील कालावधीनंतर कोजागिरी पौर्णिमा म्हणून पार पाडायचो. दोन वेगवेगळ्या उपक्रमाचा हॉल घेण्यापासून ते दूध, नाश्ता देण्यापर्यंत होणारा खर्च विचारात घेता एकाच दिवशी करायचे ठरले आणि म्हणूनच पुढे गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार कोजागिरी पौर्णिमेचे औचित्य साधून करण्याचा घाट घातला गेला. ह्यात दोन फायदे झाले. एकाच दिवशी सभासदांची उपस्थिती जास्त जाणवू लागली. मुलांचे कौतुक करण्यासाठी प्रेक्षकवर्ग मोठ्या प्रमाणात मिळू लागला. सोबत एक मनोरंजनाचा कार्यक्रम ठेवल्यामुळे लोकांचीही करमणूक झाली. नाश्ता व दुग्धपानाचे ग्रहण करुन कोजागिरीचेही महत्व वाढू लागले. एका दिवसात दोन उपक्रमांनी हॉलचे भाडे वाचले. भरगच्च कार्यक्रमांनी सभासदांच्या ओळखी होण्यास मदत झाली.

दरवर्षीप्रमाणे यंदाही दिनांक 28 ऑक्टोबर 2012 रोजी कालिदास कॅफे येथे दुपारी 4 वाजल्यापासून गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार व कोजागिरी पौर्णिमा हा उपक्रम मोठ्या उत्साहात पार पडला. श्री. महेश दुर्वे, कार्यासन अधिकारी (सार्वजनिक बांधकाम विभाग, मंत्रालय, महाराष्ट्र राज्य) आणि त्यांच्या सुविद्य पत्नी सौ. दुर्वे ह्यांच्या हस्ते पारितोषिके वाटण्यात आली. ह्या कार्यक्रमात प्रामुख्याने एक गोष्ट आम्ही पहिल्यापासून करीत आलो आहोत व ती म्हणजे मुलुंड मधील प्रथम क्रमांकाने येणारा मुलगा / मुलगी मग तो कुठल्याही जाती धर्माचा असो त्याचा सत्कार आम्ही जाणीवपूर्वक करीत आलो आहोत. सर्वधर्मसमभाव आणि संकुचित वृत्तीपासून दूर रहावे हीच त्यामागील संस्थेची भावना असते. एका सामाजिक बांधिलकीची सेवा आपल्या हातून घडावी हाच त्यामागचा हेतू आहे. सुदैवाने ह्यावर्षी आमच्याच ज्ञातीतील कु. सानिका देशपांडे हिला हा मान मिळाल्यामुळे आमची हृदये गर्वानी आणखीन फुलून गेली व तिला आम्ही व्यासपीठावर बोलावून ``यशाचे गमक काय’ म्हणून चार शब्द बोलण्याची विनंती केली. उपस्थित पालक मंडळींना माहिती मिळावी, धकाधकी व चढाओढीच्या जीवनात अभ्यासाकडे पहाण्याचा दृष्टिकोन समजावा, एखादी गोष्ट मुलांवर लादण्यापेक्षा त्यांच्या कलेने कशी हस्तगत करुन घ्यावी ह्या सर्व गोष्टी त्या मुलीच्या चार शब्दात दिसून आल्या. त्यानंतर श्री. महेश दुर्वे यांनी आपल्या भाषणात मुलांचे कौतुक केले. मी अनेक क्षेत्रात मंत्रालयात कामे केली आहेत पण शिक्षण क्षेत्राशी माझा अजून काहीच संबंध आला नाही हे त्यांनी प्रांजळपणे कबूल करुन शैक्षणिक विचारांची माझ्याकडून कसलीच अपेक्षा न करता इतर कामात मी मंडळाला निश्चित सहकार्य करीन असे गोड आश्वासनही दिले. कार्यक्रमाचे सुत्रसंचालन श्री. शिरीष बेंद्रे ह्यांनी केले. कोजागिरीचे महत्व सांगून झाल्यावर श्री. शिरीष बेंद्रे ह्यांनी पाहुण्यांची ओळख उपस्थितांना वाखाणण्याजागी करुन दिली. कोषाध्यक्ष सौ. कांचन कारखानीस यांनी विद्यार्थ्यांच्या नावाने विषयात मिळणारे घवघवीत गुण लोकांपुढे सादर केले. त्यामुळे टाळ्यांच्या गजरात मुलांचा व पालकांचा उत्साह द्विगुणीत होत होता. सौ. पद्मा प्रधान व सौ. संगीता प्रधान ह्यांच्याकडून त्यांना वेळोवेळी पुष्पगुच्छ व पारितोषिके देण्यात मोलाची मदत होत होती. आमंत्रणाबरोबर आवाहनाचे एक पत्रक जोडले असल्यामुळे अनेकांनी ह्यावर्षीच्या देणग्या मंडळापुढे सुपूर्द केल्या.

मध्यंतराचा वेळ न ठेवल्यामुळे बसल्या जागेवर उपस्थितांना नाश्ता म्हणून गरम उपमा, मटार करंज्या व दुग्धपानाचा स्वाद चाखता आला. सोबत सौ. संध्या प्रधान यांचा सुगम संगीताचा कार्यक्रम चालू झाला. आपल्या वाद्यवृंदासह त्यांनी 20/25 ठराविकच पण सुश्राव्य गाणी रसिकांपुढे सादर केली. प्रेक्षक आपले आसन सोडत नाहीत पाहून त्यांचाही उत्साह वाढला व अशा तऱहेने हा सुगम संगीताचा कार्यक्रम बहारदार स्वरुपात पार पाडून कार्यक्रमाची सांगता झाली.