मुखपृष्ट |  आमच्याविषयी | स्फुर्तीस्थान |  कार्यक्रम |  उपक्रमसभासद देणगी चॆत्रावली मंडळसाहित्य |  छायाचित्र |  संपर्क
 
 
 
स्वागत

ज्ञातिबांधवांनो

सप्रेम नमस्कार !

चांद्रसेनीय कायस्थ प्रभु समाजोन्नती मंडळ,मुलुंड,मुंबई यांच्यावतीने सुरु करण्यात आलेल्या या वेब साईटवर आपणा सर्व ज्ञातीबांधवांचे आम्ही अतिशय मन:पूर्वक स्वागत करीत आहोत.

चांद्रसेनीय कायस्थ प्रभु समाजाचे ब्रीदवाक्य ज्या दोन सूत्रमय शब्दांनी व्यक्त केले जाते ते शब्द म्हणजे असि व मसि. असि म्हणजे तलवार व मसि म्हणजे शाई वा लेखणी. गेल्या 2000 वर्षांत विक्रम संवताच्या स्थापनेपासुन असिजीवी – मसिजीवी जीवन जगणारे चांद्रसेनीय कायस्थ प्रभु तलवार व लेखणी हेच आपले प्रतिक मानतात. गेल्या अनेक वर्षांत या देशांत अनेक सामाजिक स्थित्यंतरे झाली पण तरीही आपल्या चांद्रसेनीय कायस्थ प्रभु समाजाने आपली क्षात्रवृत्ती व लेखनवृत्ती आजमितिपर्यंत कायम ठेवलेली आहे हे विशेष. व हेच आपल्या समाजाचे सर्वांत मोठे यश आहे. हिंदवी स्वराज्याच्या संस्थापनेच्या कार्यामध्ये छत्रपती शिवाजी महाराजांना सर्वोतपरी मदत करणाऱया व प्रसंगी बलिदान करणाऱया ज्या ज्ञाती होत्या त्यामध्ये चांद्रसेनीय कायस्थ प्रभु ही आपली ज्ञाती अग्रस्थानी होती.व हे आपण एक कायस्थ प्रभु म्हणुन अतिशय अभिमानाने सांगु शकतो. शिवशाहीसाठी आपल्या कायस्थ वीरांनी फार मोठे आत्मसमर्पण केले.

आपला समाज हा संख्येने जरी लहान असला तरीही गुणवत्तेने फार मोठा आहे. राजकारण, समाजकारण, शिक्षण, संरक्षण, वैद्यकशास्त्र ,साहित्य, कला, क्रिडा इत्यादी अनेक क्षेत्रामध्ये आपल्या समाजांतील अनेकांनी स्वत:च्या कर्तृत्वाने स्वत:चे आणि देशाचे नाव उज्वल केले आहे.

आज आम्ही अभिमानाने सांगु शकतो की वरील या सर्व क्षेत्रांत आमचा मुलुंड येथील कायस्थ समाज जराही मागे नाही. मुलुंड मध्ये रहाणाऱया कायस्थ कुटुंबांतील अनेकांनी आपल्यातील अंगभूत गुणांनी यापैकी अनेक क्षेत्रांत मोठी भरारी घेत आपले व आपल्या ज्ञातीचे नाव उज्वल केले आहे. आज ही वेबसाईट सुरु करताना आम्हा सर्वांना एक वेगळाच आनंद होत आहे. सध्याचे युग हे संगणकांचे युग आहे. ज्याला संगणक हाताळता येत नाही ती व्यक्ती निरक्षर अशी एक साक्षर-निरक्षरतेची नवीनच व्याख्या तयार झाली आहे. संगणकानी अवघे जीवन व्यापलेल्या सध्याच्या या युगांत एकमेकाशी संपर्क करण्याकरीता फेसबुक, ई-मेल, वेब साईट्स अशा वेगवेगळ्या माध्यमांचा सर्रास वापर सर्वत्र होउ लागलेला आहे. व यात आपल्या समाजांतील लहान थोर अशी सर्व मंडळी कोठेही मागे नाहीत. परदेशी असलेल्या आपल्या मुलांशी,नातेवाईकांशी वा एखाद्या शाळकरी मित्र-मैत्रीणींशी फेसबुकवरुन संपर्क साधणे सहज शक्य झालेले आहे. त्यामुळेच सीकेपी सिनिअर्स, सीकेपी यंग वर्ल्ड,सीकेपी खवय्ये अशा नावाने अनेक साईट्स सुरु करत या साईट्सच्या माध्यमांतुन आपल्या ज्ञातीबांधवांनी ज्ञातीसंवर्धन व विविध विषयांवरील विचारांचे आदान प्रदान सुरु केलेले आहे. या सगळ्या तंत्रज्ञानामुळे आपण सारे आता एकमेकाच्या खुपच जवळ आलेलो आहोत. या सगळयातुन आता आपल्या गावातील, शहरांतील वा देशाच्या कानाकोपऱयांतीलच नव्हे तर अवघ्या जगभरांच्या कानाकोपऱयांत असलेल्या आपल्या ज्ञातीबांधवांशी अतिशय गतिमानपध्दतीने संपर्क साधणे सहज शक्य झालेले आहे. या सर्व पार्श्वभूमीवर अशा एखाद्या वेबसाईट्सची निर्मीती करणे मंडळाला सद्यस्थितीत अतिशय आवश्यक झालेले आहे. जगभर सर्वत्र कामानिमित्त गेलेल्या वा स्थयिक झालेल्या कायस्थ ज्ञातीबांधवांशी संपर्क करता यावा या एकाच भावनेने आम्ही मुलुंडच्या चां.का.प्र. समाजोन्नती मंडळाची ही वेब-साईट सुरु करीत आहोत. एकादृष्टीने या वेब-साईटच्या माध्यमातुन आपल्या या समाजोन्नती मंडळाने आता अगदी आपल्या घरातच शिरकाव केला आहे असे म्हटले तर ते वावगे ठरणारनाही.

मित्रहो, आता ज्ञातींतील अनेक तरुणांनी पुढे येऊन या वेब-साईटच्या माध्यमातुन आपले विचार मांडण्याची करण्याची गरज आहे. आम्हाला माहीत आहे की तुम्हा मंडळींना मुलुंडच्या आपल्या समाजोन्नती मंडळाच्या कार्यालयात येउन अनेक वेळेला एखाद्या विषयावर काहीतरी सांगावसे वाटत असते, एखादी सूचना करावीसी वाटत असते, पण तुमच्या कामाच्या धावपळीतुन तुम्हाला ते शक्य होत नाही. पण आता मात्र या वेब-साईटच्या माध्यमातुन तुम्ही तुमच्या मौलीक सूचना नक्कीच मांडु शकता,एखादा लेखही लिहु शकता वा ज्ञातीबांधवांना एखादे आवाहनही करु शकता. समाजांतील कोणत्याही क्षेत्रांत उज्वल यश मिळविणाऱया आपल्या ज्ञातीबांधवांची फोटोसकट माहीतीही पाठवु शकता वा हळुच आपला अनुरुप जोडीदारही शोधु शकता. आम्हाला या सगळ्याचा खुप आनंदच होईल. या सगळ्यातुन तुम्ही ज्ञातीसंवर्धनाच्या कार्याला हातभार लावु शकता.

मुलुंडच्या या चांद्रसेनीय कायस्थ प्रभु समाजोन्नती मंडळाची सुरुवात ज्ञातीसंवर्धनाच्या दृष्टीकोनांतुन 1971 साली मुलुंड येथील पाच पंचवीस कायस्थ कुटुंबाना एकत्र आणुन मुलुंडच्या काही ज्ञातीबांधवांनी केली व आज आम्ही अभिमानाने सांगु शकतो की सभासदांची ही संख्या 700 कुटुबांच्यापुढे पोहोचलेली आहे. पसारा वाढला आहे.काम वाढले आहे. पण यात आमची एक व्यथा अशी आहे की, ज्ञातीसंवर्धनाचे हे कार्य पुढे नेण्यासाठी आवश्यक असलेली स्वत:च्या मालकीची अशी वास्तु मुलुंडमध्ये आजपर्यंत आपण उभी करु शकलेलो नाही. गेल्या काही वर्षांत अनेक ज्ञातींच्या वास्तु मुलुंडच्या या विभागांत उभ्या राहिल्या पण चार दशके लोटली तरीही आपण स्वत:च्या वास्तुविनाच या विभागांत कार्य करीत आहोत. या सगळ्याचा विचार करता मंडळाची हक्काची एक वास्तु आता लवकरात लवकर उभी राहावी हा विचार आम्ही या वेबसाईटच्या माध्यामातुन आपल्या पुढे या निमित्ताने ठेवीत आहोत. अर्थात या करिता आपणा सगळ्यांची साथ हवीच आहे. व निधीचीही गरज आहे. व आम्हाला खात्री आहे की, या करीता लागणारा आवश्यक तो निधी या वेबसाईटच्या माध्यमातुन आम्ही उभारु शकतो. आपल्यापर्यंत पोहोचत आपल्या सारख्या अनेक ज्ञातीबांधवांना साद घालीत आम्ही नजिकच्या काळात हे स्वप्न पूर्ण करु शकतो. आम्हाला खात्री आहे की आपण सगळे जण हे स्वप्न साकार करण्यासाठी नक्कीच प्रयत्न कराल. या करीता आम्हाला तुमची अमुल्य साथ हवी आहे. काय मग देणार ना साथ आम्हाला? चला आपण सगळे मिळुन प्रयत्नाने ज्ञातीची वास्तु उभारुया!

असो. ज्ञातिबांधवांनो, आपण आता चां.का.प्रभु समाजोन्नती मंडळ, मुलुंडच्या या वेब साईटला भेट दिलेलीच आहे. तेव्हा तुम्ही आता एक काम करा व ते म्हणजे आपल्या या वेब साईटची लिंक आपल्या जास्तीत जास्त ज्ञातीबांधवांनाही पाठवा.जेणेकरुन या वेब साईटला अनेक ज्ञातीबांधव भेट देतील. या वेब साईटला भेट दिल्याबद्दल चां.का.प्रभु समाजोन्नती मंडळ,मुलुंड, मुंबई यांच्यातर्फे आपणा सर्व ज्ञातीबांधवांना खुप खुप धन्यवाद व अनेक शुभेच्छा !